पुणे प्राईम न्यूज डेस्क: बदलत्या जीवनशैलीनुसार, आपल्या अनेक गोष्टी बदलत जात आहेत. असे करताना आपण अनेकदा पारंपारिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम नंतर जाणवू शकतात. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे बनले आहे. त्यात आपल्याला थंड हवा देणाऱ्या एसीचा वापर कमी प्रमाणात करणेच हिताचे बनते.
एसीच्या अधिक वापराने अनेक समस्या उद्भवू शकतात. एसीच्या थंड हवेमुळे शरीराचे तापमान खूप कमी होते. ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाबावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. चक्कर येणे, उलट्या होणे, रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. एसीमध्ये जी लोकं जास्त वेळ घालवतात, त्यांना सामान्य लोकांपेक्षा श्वसनाच्या समस्या जास्त असतात. नाक, घसा यांसारख्या अवयवांमध्ये थेट हवा जाते. त्यामुळे अडचणी वाढू शकतात.
यापूर्वी सर्वच ठिकाणी फॅनचा वापर केला जायचा. फॅनमधून येणारी हवा फारशी बाधक नसायची. पण एसीमधून येणारी थंड हवा चांगलीच बाधक ठरत आहे. एसीच्या हवेमुळे नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच एसी नीट साफ न केल्यास त्यात भरपूर धूळ साचते. असे झाल्यास दमा किंवा ऍलर्जी होण्याचा धोका दुप्पट असू शकतो.
यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एसीच्या हवेत शरीर अत्यंत सुस्त आणि कडक होते. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी, शरीर जड होणे किंवा चालण्यात अडचण येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शारीरिक हालचाल करून जास्त वेळ एसीमध्ये न राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.