डॉ. निलेश उपरे
पुणे प्राईम न्यूज डेस्क: जेव्हा घरी बाळाचं आगमन होतं तेव्हा काय करावं, काय काळजी घ्यावी हे समजत नाही. त्यामुळे बाळाचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांना सतत सावध राहून बाळाच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. थोडासा हलगर्जीपणादेखील बाळासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे मातेसह कुटुंबातील सर्व सदस्यांनी बाळाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
नवमातांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी सगळ्या गोष्टी माहीत नसतात. नवजात बाळाची काळजी घेताना बाळाला दूध कसे पाजावे? त्यावेळी बाळाचं पोषण कसे करावे? याबाबत जाणून घ्यायला हवे. बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक आई आणि बाबा आनंदी असतात. मात्र, हे प्रेम करताना त्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक असते.
तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते. असे नसल्यास संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी बाळाला हाताळणाऱ्या प्रत्येकाचे (तुमच्यासह) हात स्वच्छ आहेत की नाही, याची नेहमी खात्री करा. बाळाला घेऊन जात असताना किंवा झोपवताना नेहमी डोके आणि मानेला आधार द्या. लहान बाळांच्या डोळ्यात काजळ अथवा सुरमा लावू नये. नाकात व कानात टेल टाकू नये. सकाळी कोवळ्या उन्हात ठेवावे. नवजत बाळाला गुट्टी, मध, ग्राईफ वॉटर, घरचे पाणी देऊ नये
हिवाळ्यात थंडी जसं-जशी वाढत जाते, तसं-तशी ती सहन करणे अवघड होऊन जाते. यात लहान मुलांसाठीही थंडी खूप त्रासदायक असते. विशेषत: ज्या लहान बाळांना पहिल्यापासूनच सर्दी, खोकल्याचा त्रास आहे, ते ही थंडी सहन करु शकत नाहीत. या हंगामात सर्दी, खोकला आणि विविध विषाणूंचा लोकांना खूप त्रास होत असतो. त्यामुळे आपल्याबरोबरच लहान बाळाचीही खूप काळजी घेणे आवश्यक असते.
घरातील वातावरण उबदार ठेवा
बाळाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील वातावरण उबदार ठेवा. थंडीच्या दिवसात दारं, खिडक्या शक्यतो बंद ठेवा. उबदार कपडे घाला. जाड स्वेटरऐवजी तुम्ही बाळाला थोडे हलके पण उबदार कपडे घाला, ज्यामुळे ते जास्त चिडचिड करणार नाही आणि थंडीपासूनही त्यांचे संरक्षण होईल. कोमट तेलाने मसाज करा. याशिवाय स्तनपान करणाऱ्या महिलांनी थंड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
स्वच्छतेची घ्या विशेष काळजी
बाळांना विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कारण घाणीमुळेही बाळ आजारी पडू शकते. अशा परिस्थितीत बाळाला व्हायरल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्यवेळी लसीकरण करा. तसेच सॅनिटायझरचा वापर करा.
मातांनो, बाळाला झोपून स्तनपान करू नका
बाळाला झोपून दूध पाजू नये. प्रत्येक वेळी दूध पाजल्यावर पंधरा ते वीस मिनिटे खांद्यावर थोपटल्याने बाळाची उलटी होणार नाही. तसेच बाळ व्यवस्थित ढेकर देईल. उचकी देणार नाही व त्याचे वजन वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर बाळाची शी-शू योग्य पद्धतीने होतील. बाळाला ठराविक वेळेत थोडे थोडे दूध पाजावे. भुकेलेले बाळ पटापट दूध पिते व जास्तीचे प्यायलेले दूध बाहेर टाकते, अशावेळी श्वसननलिकेत दूध जाण्याची भीती असते. त्यामुळे याकडेही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच कमी वजनाचे बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी. रात्री नवजात बाळाजवळ झोपताना खबरदारी घ्यावी. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(लेखक हे विश्वराज हॉस्पिटल येथे बालरोगतज्ञ आहेत)