Health tips : मीठ हे पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी गरजेचे असते. बहुतांश अन्नपदार्थ बनवताना मीठाचा वापर हा केला जातोच. मीठ अन्नपदार्थ रुचकर आणि चविष्ट बनवते. हे असे जरी असले तरी आहारात मीठाचा वापर हा कमी असायला हवा. जर तसं नाही झालं तर रक्तदाबासह अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रतिवर्षी अंदाजे 1.80 दशलक्ष मृत्यू अति सोडियम सेवनसंबंधी आहेत. जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळायचे असतील तर आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करणे हाच एक सर्वोत्तम आणि स्वस्त उपाय आहे. आपण सहसा वापरतो ते पांढरे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड असते. जे आयोडिनयुक्तही मिळते. पण यामध्ये आयोडिन हे नैसर्गिकरित्या नसते. दुसरे म्हणजे सैंधव (पिंक सॉल्ट) यात आयर्न ऑक्साईड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे मिनरल्स असतात. पण यात सोडियम आणि आयोडिनची मात्रा टेबल सॉल्टपेक्षा कमी असते.
कोणत्या पदार्थांतून वाढते सोडियम?
जवळपास सर्व धान्ये, डाळी, भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम असतेच. रोजच्या जेवणाचे सोडियम मोजले तर ते अंदाजे 2 ते 4 ग्रॅमपर्यंत जाते. लोणचे, बेकरीचे पदार्थ, केक, बिस्कीट, पॅकेट बंद नूडल्स, मॅगी मसाले, सॉस जर तुम्ही खात असाल तर त्यानुसार आहारात सोडियम आणखी वाढते.
आरोग्यासाठी सोडियमही गरजेचे
सोडियम हे शरीरातील काही महत्वाची कार्य करते. शरीरातील पाण्याची मात्रा प्रमाणात ठेवणे, मज्जातंतूचे संदेश पुढे पाठवणे यांसारखी कार्ये सोडियममुळे होतात. त्यामुळे सोडियमही आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. पण जास्त प्रमाणात सोडियम घेणे तितकेच घातक आहे.
सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास कोणते आजार उद्भवतात?
मीठाच्या माध्यमातून आपल्या आरोग्यात सोडियम मिळते. पण हे सोडियमचे प्रमाण अतिरिक्त असले तर अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यात उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोग, मूत्राशयाचे आजार, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा, जठर व आतड्यासंबंधीचे आजार होऊ शकतात.
आहारात मीठाचे प्रमाण किती असावे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रोजच्या आहारात 2000mg इतके सोडियम घेतले पाहिजे. म्हणजे 5gm पेक्षा कमी पांढरे मीठ म्हणजेच 1 चमचापेक्षा कमी मीठ दिवसभराच्या आहारात घेतले पाहिजे. आपण जेव्हा बटाटा वेफर्सचे एक पॅकेट खातो तेव्हा जवळपास दिवसभराचे 1/4 सोडियमचे प्रमाण तिथेच घेतो. म्हणजे 500mg असे कळत नकळत बरेच पदार्थ आपण खात असतो.
सोडियमचे प्रमाण कमी कसे करावे?
– ताजे, कमीत कमी प्रक्रिया केलेलं पदार्थ खा
– पॅकेटवरील न्यूट्रिशन फॅक्ट वाचून कमी सोडियम उत्पादने निवडा. (120mg/100gm)
– मीठ कमी प्रमाणात टाकूनच अन्न पदार्थ शिजवा
– मीठाऐवजी चिंच, आमसूल, ओरिगानो, ओवा पाने इत्यादींचा वापर अन्नाला चव देण्यासाठी करा
– व्यावसायिक सॉस, ड्रेसिंग , मसाले आणि ‘रेडी टू इट’ उत्पादनांचा वापर मर्यादित करा
मीठ नेमके कोणते वापरावे?
मीठ कोणतेही वापरा त्यात सोडियमची मात्रा ही असतेच. मीठ काळे असो किंवा पांढरे पण कमी प्रमाणात वापरावे. दररोज एक चमचापेक्षाही कमी मीठ असावे. खडे मीठ, सैंधव हे टेबल सॉल्टपेक्षा चांगले असते, हा निव्वळ गैरसमज आहे. मीठ कोणतेही असो त्यातील सोडियम घातकच असते. त्यामुळे मीठाचे प्रमाण कमी ठेवणे हेच फायद्याचे असते.
– डॉ. श्रद्धा खुस्पे
आहार व पोषणतज्ज्ञ, विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर