आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, व्यायाम करण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यात काही तरूणमंडळी जिममध्येही जातात. पण, जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण हल्ली वाढताना दिसत आहे. त्यामुळे अशी काही लक्षणे आहेत ती आपल्यामध्ये दिसल्यास तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
हृदयाशी संबंधित बहुतेक समस्यांमध्ये, छातीत दुखणे हे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. व्यायाम करताना जडपणा किंवा वेदना जाणवत असल्यास, व्यायाम त्वरित थांबवा आणि शरीराला विश्रांती द्या. हृदयविकाराचा झटका आल्यास छातीत दुखणे हात, मान, जबडा किंवा पाठीवर पसरू शकते याची नोंद घ्यावी. असा त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यायामादरम्यान दम लागणे सामान्य आहे. पण, जर ते जास्त किंवा त्रासदायक झाले, जसे की आपल्याला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असल्यास ते एक गंभीर लक्षण असू शकतं.
जर तुम्हाला चक्कर येणे ही समस्या जाणवत असेल मग ती व्यायामादरम्यान किंवा नंतर असेल तरीही हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर लगेच व्यायाम करणे थांबवा आणि जोडीदाराच्या मदतीने डॉक्टरकडे जा. ही सर्व लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्यायाम करणे टाळावे.