पुणे प्राईम न्यूज डेस्क : आपण निरोगी राहावं असे सर्वांनाच वाटत असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे काही आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वेळीच आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे बनले आहे. 30 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
नियमित आरोग्य तपासणी केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, अपचन, हृदयाचे आजार, मूत्रपिंड विकार यांसारख्या आजारांची माहिती मिळवता येऊ शकते. त्यामुळे वेळीच जीवनशैलीत बदल करून व योग्य उपचार घेता येऊ शकतात. मधुमेह तपासणी, वजन, कोलेस्ट्रॉलची पातळी, यूरिक अॅसिडस्, हिमोग्राम, मूत्रपिंड आणि यकृत कार्य चाचणी, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल, सोनोग्राफी, लठ्ठपणा आणि चरबीचे प्रमाण यासाठी रक्त तपासणी करता येते.
सध्या अगदी 30 ते 40 वर्षे वयोगटात आढळणार्या आजारांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुसाचा रोग, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका, चयापचय विकार आणि यकृत रोग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळातच या आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेऊन उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुत रोखता येऊ शकते.
तसेच थायरॉईड, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, चिंता, नैराश्य, अपचन आणि मायग्रेन या अनुवंशिक आरोग्याच्या समस्या आहेत. तरुण स्त्रियांमध्ये थायरॉईड विकार सामान्य आहेत आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. नियमित आरोग्य तपासणीद्वारे तीव्र आजारांचे वेळीच निदान करणे शक्य होते. त्यामुळे ते करणे आवश्यक बनले आहे.