बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळू शकतं. पण अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. त्यात तुमच्या काही सवयी थेट किडनीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे त्या सवयी आत्ताच बदलणे गरजेचे आहे.
निरोगी मूत्रपिंड राखण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे सर्वात महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि हानिकारक सवयी टाळणे हे दीर्घायुष्य आणि निरोगी किडनी कार्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या अशा अनेक सवयी आहेत ज्या बहुतेक लोक अगदी सामान्य मानतात. पण प्रत्यक्षात त्या किडनीला गंभीर नुकसान करू शकतात.
तुम्ही जास्त मीठ खात असाल तर ते थांबवणं गरजेचे आहे. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या वाढते. त्यामुळे किडनीलाही गंभीर नुकसान पोहोचू शकते. मिठात असलेले सोडियमचे प्रमाण मूत्रपिंडांवर दबाव आणते आणि रक्तदाब वाढवते. उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या रक्तवाहिन्या खराब होऊ लागतात. अशा समस्या टाळण्यासाठी मीठाचे सेवन कमी करावे आणि प्रक्रिया केलेले पदार्थही कमी प्रमाणात खावे.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेसे पाणी पिणे. सर्व लोकांना दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही कमी पाणी प्याल तर ही सवय मूत्रपिंडासाठी सर्वात हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे लागते.