नगर : नवरात्री उत्सवात उपवास धरणाऱ्या १५ भक्तांना वरई पिठाची भाकर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना करंजी (ता. पाथर्डी) येथे उघडकीस आली आहे. नागरिकांवर अहमदनगर आणि तिसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रकाश गोवर्धन राठोड, लिलाबाई लक्ष्मण चव्हाण, अनिता प्रकाश राठोड, रामदास रावजी चव्हाण, गीताबाई रामदास चव्हाण, अशोक तारू चव्हाण, सुशीला अशोक चव्हाण, रमेश संतोष चव्हाण (सर्व रा. करंजी) या आठ तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. तर खंडोबावाडी, मराठवाडी येथील काही लोकांना त्रास झाला असून काहींवर नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गावातील अनेक महिला पुरुषांनी नवरात्रीचे उपवास धरले आहेत. उपवासाच्या पहिल्याच दिवशी गावातील काही महिलांनी एका किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणले होते. आणि त्या पिठापासून भाकरी तयार केल्या.
दरम्यान, नागरिकांना त्या भाकरी खाल्ल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही लोकांना उलट्या, जुलाब होऊ लागल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व विषबाधा झालेल्या नागरिकांची प्रकृती स्थिर आहे.