पुणे : ‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा असतो, असं म्हणतात, पण चहा कधी पिणे योग्य आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हीही जेवणानंतर चहा पीत असाल, तर तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जेवणानंतर चहा पिण्याची तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते.
चहामध्ये कॅफिन असते, जे शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्टेरॉइड हार्मोन वाढवते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया जेवल्यानंतर चहा पिल्याने आरोग्याला काय नुकसान होते
अनेकांना जेवल्यावर चहा पिण्याची सवय असते. ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. तुम्हीही सकाळी उठल्यानंतर आणि दिवसभरात प्रत्येक जेवणानंतर एक कप चहा पीत असाल तर, ही सवय लगेच बदला.
डोकेदुखीचे कारण ठरते-
जेवणानंतर चहा घेतल्यास डोकेदुखी होऊ शकते. वास्तविक, जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीरात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. शरीरात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
रक्तदाब वाढतो-
जे लोक जेवणानंतर चहा पितात त्यांना उच्च रक्तदाब होऊ शकतो. चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर जेवणानंतर चहा पिऊ नका.
लोहची कमतरता-
जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता देखील होऊ शकते. चहा प्यायल्याने शरीर प्रथिनांसह आवश्यक पोषक द्रव्ये शोषू शकत नाही, ज्यामुळे लोह किंवा रक्ताची कमतरता सुरू होते. चहामध्ये आढळणारे फिनोलिक कंपाऊंड लोहाच्या शोषणात व्यत्यय आणते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते.
हृदयासाठी चांगले नाही-
जेवल्यानंतर लगेच चहा पीत असाल तर ही सवय लगेच सोडा. या सवयीमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही वेगवान होतात.
पचनसंस्थेच्या समस्या वाढतात-
अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीराची पचनक्रिया कमकुवत होते, त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. इतकंच नाही तर त्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्त्वंही मिळत नाहीत. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने माणसाला गॅस, अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो.