पुणे : आपण जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी लेन्सेस काढून ठेवणे डोळ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या लेन्सेस रात्री झोपतानाही घातल्या गेल्या तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवतो. जर हे इन्फेक्शन हाताबाहेर गेले, तर यामुळे अंधत्वदेखील येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
लेन्सेस वापरत असताना डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, तर याचे मोठे दुष्परिणाम उद्भवू शकतात. अमेरिकेतील न्यू मेक्सिको विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी हे निदान केले आहे. लेन्सेस वापरत असताना योग्य काळजी न घेतल्याने किंवा रात्री झोपताना देखील लेन्सेस घालून ठेवल्याने डोळ्यातील ‘कॉर्निया’मध्ये इन्फेक्शन होऊन ‘मायक्रोबियल केराटायटीस’सारखे विकार उद्भवू शकतात.
तसेच इन्फेक्शनच्या सोबतीने कायमचे अंधत्वही येण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जाते. लेन्सेस घालून झोपणे धोकादायक आहे. लेन्सेस घालून झोपल्याने डोळ्यांमध्ये मायक्रोबियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर डॉक्टरांच्या सल्ल्याविना, स्वतः होऊन लेन्सेसचा वापर केल्यासही तोटा होऊ शकतो. कारण डोळ्यांमध्ये ‘कॉर्नियल अल्सर’ होऊन डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच लेन्सेसचा वापर करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे.