Health News पुणे : पावसाळ्यात अळूही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतात. अनेकांच्या अंगणात, परिसरात अळू दिसतोच. अळूची पाने आणि अळूचा कंद आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतो. अळूची भाजी पूर्वी केवळ आशियातच लोकप्रिय होती, पण तिचे आरोग्यदायी गुण पाहून आता जगभर तिचा प्रसार झालेला आहे.
अनेक गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी अळूची भाजी उपयुक्त असते. अळूमधील फायबर आणि रेजिस्टन्स स्टार्च वाईट कोलेस्टेरॉलला कमी करून हृदयविकाराचा धोका घटवतो. मधुमेहाच्या रुग्णांनाही अळूचा लाभ होत असतो. इन्शुलिन नियंत्रित करण्यासाठी डायटरी फायबर महत्त्वाचे ठरते, जे अळूमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आढळते. ‘टाईप-2’ मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते अतिशय लाभदायक आहे. अळूमधील टॅनिन नावाचा घटक शरीरातील फॅट, कार्बोहायड्रेटचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करतो.
अळूच्या पानात अँटी-उन्फ्लेमेटरी, हायपोलिपिडेमिक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी अळू उपयुक्त ठरतो. अळूमध्ये पॉलिफेनॉल्सही मोठ्या प्रमाणात असल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, बद्धकोष्ठता दूर करणे, डोळ्यांचे आरोग्य तसेच स्नायू मजबूत करण्यासाठीही अळू उपयुक्त आहे.