पुणे, ता.२६ : सुदृढ, निरोगी आरोग्य लाभावे, असे सर्वांनाच वाटत असते. पण प्रत्येकाला कधीना कधीतरी काहीना काहीतरी समस्या जाणवतेच. त्यात लठ्ठपणा ही समस्या अनेकांना सतावत असते. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. आजकाल ही समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
स्थूल किंवा लठ्ठ असणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे प्रमाणाबाहेर लठ्ठपणा वेळीच कमी करणे गरजेचे बनले आहे. लठ्ठ व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लठ्ठपणावर नियंत्रण न ठेवल्यास अनेक रोग बळावतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारखे विकार कधी जडतात याचा पत्ताही लागत नाही.
वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराची चपळता वाढत नसते. त्या उलट ते कमी होत असते. अतिरिक्त वजन, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे बनले आहे. आपल्या शरीराकडे विशेष लक्ष देण्यासाठी हेल्थ क्लबमध्ये प्रवेश घेतल्यास त्याचा जरूर फायदा होतो.
दररोज नियमितपणे व्यायाम, योगा केल्यास आत्मविश्वास वाढतो. याशिवाय आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी आवश्यकतेवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहार ठरवता येतो. अचानक आहार कमी केल्यास त्याचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारासंबंधी कोणताही बदल करावयाचा असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांना सल्ला घ्यावा.