Health News : लाल-लाल स्ट्रॉबेरी अनेकांना आवडते. ही स्ट्रॉबेरी रोज खाल्ल्यास मेंदूचा विकास होतोच. याशिवाय, उच्च अँटिऑक्सिडंट क्षमता आणि रक्तदाब यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हृदय आणि मेंदूच्या विकासामध्ये कोणते लाभ होतात, हे पाहण्यासाठी याबाबतचे संशोधन करण्यात आले होते. या संशोधनासाठी 66 ते 78 वर्षे वयोगटातील 35 निरोगी पुरुष व महिलांची एक पाहणी करण्यात आली. (Health News)
स्ट्रॉबेरी रोज खाल्ल्यास मेंदूचा विकास
या लोकांनी स्ट्रॉबेरीच्या 26 ग्रॅम भुकटीचे सेवन केले होते. आठ आठवड्यांपर्यंत प्रत्येकाला स्ट्रॉबेरीची पावडर देण्यात आली. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने मेंदूच्या आकलन क्षमतेमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच सिस्टोलिक रक्तदाबात 3.6 टक्क्यांनी घट झाली. एकूण अँटिऑक्सिडंट क्षमतेत 10.2 टक्क्यांची उल्लेखनीय वृद्धी पाहण्यास मिळाली. या संशोधनावरून असे दिसून आले की, स्ट्रॉबेरीचे सेवन मेंदूच्या विकासाला उत्तेजन देऊ शकते. तसेच उच्च रक्तदाबासारख्या हृदयाशी संबंधित समस्या कमी करू शकते. दैनंदिन आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केल्याने आरोग्यामध्ये इतके लाभ होऊ शकतात. (Health News)
स्ट्रॉबेरी हे अनेक बायोअॅक्टिव्ह घटकांचा स्रोत आहे. आपल्या दैनंदिन ‘क’ जीवनसत्वाची गरज ते शंभर टक्के भागवू शकते. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये फोलेट, पोटॅशियम, फायबर, फायटोस्टेरॉल आणि पॉलिफेनॉलसारखे हृदयासाठी पोषक घटक असतात. त्यामुळे ते खाल्ल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.