पुणे, ता.२० : तोंड आल्याने चांगलाच त्रास होत असतो. अशावेळी काय करावं, काय नको हे समजत नाही. पण त्यापासून आराम मिळावा यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. त्यासाठी काहीना काहीतरी केलं जातं. मात्र, हे तोंड का येतं हे काही केल्या समजत नसतं. याचबाबत आपण माहिती घेणार आहोत.
तोंड येणे ही समस्या अनेकांनी अनुभवली असेल. यामध्ये तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट व आंबट चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही. हे दुखणे फार मोठं नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो.
हे तोंड का येतं?
अति प्रमाणात तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन करणे, अति धुम्रपान, पचनाच्या तक्रारी असलेल्यांनाही वारंवार तोंड येते. विशेषतः पोट साफ नसल्यास दातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाल्यास ते लागून तोंडात व्रण उठतात.
काय घ्यावी काळजी?
तोडांची नियमित व योग्यप्रकारे स्वच्छता करावी. जेवणाच्या वेळा पाळाव्यात. रात्रीची झोप व्यवस्थित घ्यावी. अति तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावे. फास्ट फूड, जंक फूड घेऊ नये. अति थंड, अतिगरम असे पदार्थ खाऊ नये. उन्हाळ्यामध्ये मासांहार टाळावाच. तोंड आल्यावर जिरे चावून खाल्ल्यानेही फायदा होतो. तोंड आल्यानंतर अतिगरम, थंड पदार्थ घेऊ नयेत.