पुणे : मानवी शरीराला व्यायाम गरजेचा असतो. त्यात सूर्यनमस्काराला विशेष असे महत्त्व आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एकप्रकारे संधीच असते. सूर्यनमस्कार हा एकप्रकारचा योगाभ्यास असतो. शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. ध्यानात जाण्याची ती पहिली पायरी असते.
सूर्यनमस्कार केल्याने मन शांत व एकाग्र बनते. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, सूर्यनमस्कार हे मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग असावेत. त्यामुळे सहनशक्ती वाढते व चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो. सूर्यनमस्कारांचा नेहमी सराव केल्यास शारीरिक ताकद व जोम वाढतो. भावी खेळाडूंसाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.
ज्यामुळे स्नायूंची शक्ती, मणका व इतर अवयवांची लवचिकता वाढते. महिलांनाही सूर्यनमस्कार केल्याचा त्याचा चांगला फायदा होतो. स्वास्थ्याविषयी जागरूक असणाऱ्या महिलांसाठी हे एक वरदानच आहे. कारण सूर्यनमस्कारांनी जास्तीचे उष्मांक तर वापरले जातातच. परंतु, पोटाच्या स्नायूंना ताण पडल्याने शरीर सहजगत्या सोप्या व स्वस्त पद्धतीने सुडौल बनते.
सूर्यनमस्कारांतील काही आसनस्थिती ग्रंथीचे, जसे कंठग्रंथीचे (जी वजन नियंत्रित करते), कार्य सुधारतात व संप्रेरकांचा स्त्राव वाढल्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. सूर्यनमस्कारांच्या या अशा अनेक फायद्यांमुळे शरीर आरोग्यदायी व मन शांत होते. म्हणूनच त्यांचा नियमित सराव करावा असे योगतज्ञांचे म्हणणे आहे.