(H3N2 virus) अहमदनगर : H3N2 virus अर्थात इन्फ्लुएन्झा व्हायरसने महाराष्ट्रातील पहिला बळी नगरमध्ये घेतला आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरसची (H3N2 virus) लागण झालेल्या एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनासह इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण झाली होती. त्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरागे यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच महाराष्ट्रात पहिल्यादांचा (H3N2 virus) मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
कोवीड १९ टेस्ट पॉझिटिव्ह…!
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. गत आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता.
तेथून आल्यानंतर तो आजारी पडला. त्याची कोवीड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल केले.
तेथील तपासणीत कोवीड १९ सोबतच एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याला रेमडेसिवीरसोबत आवश्यक ते डोसही देण्यात आले. मात्र सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान,या गंभीर घटनेची दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी तातडीने घेऊन आरोग्य विभागाची बुधवारी (ता.१५) सकाळी बैठक घेतली. आणि पुढील सूचना व उपाययोजनांची दिशा ठरवली आहे.
हरियाणा आणि कर्नाटक राज्यात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रात एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा पहिला व देशातील तिसरा बळी या विषाणूने घेतला. कोरोना लाटेतही राज्यात नगर हॉटस्पॉट ठरले होते. आता एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या नव्या विषाणूचा राज्यातील पहिला बळी नगरला गेल्याने नगरकरांनी सर्तकता राहण्याची आवश्यकता आहे.
याबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे म्हणाले कि, मयत व्यक्तीच्या संपर्कात ६६ व्यक्ती होत्या. त्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सहाजण पॉझिटिव्ह होते. मात्र, त्यांना कसलाही त्रास नव्हता. उर्वरित दोघांना किरकोळ त्रास होता. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भात मदत लागल्यास जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. घोगरे यांनी केले आहे.