आपल्या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत त्याचे फायदे कदाचित आपल्याला माहिती नसतील. त्यात पेरू हे फळ अतिशय फायद्याचे मानले जाते. थंडीत खाल्ल्यानेही याचा फायदा होतो. पेरूमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे फळ खाण्याला प्राधान्य द्यावे. याशिवाय, अनेक आवश्यक घटकही यामध्ये आहेत.
पेरूमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतात. पेरूची खास गोष्ट म्हणजे चवीला गोड असूनही त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. फक्त 100 ग्रॅम पेरू 380% व्हिटॅमिन सी पुरवतो. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे महत्त्वाचे पोषक घटकही असतात. त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे.
पेरू खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि वजन नियंत्रणात मदत होते. पेरू रोज खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. याशिवाय, महिलांसाठी मासिक पाळीच्या दिवसांत जास्त त्रास होण्यापासून आराम मिळू शकतो. तसेच कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो. त्यामुळे पेरू खाण्यावर भर दिला पाहिजे.