सुरेश घाडगे
परंडा : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा (जि. उस्मानाबाद) येथे पहिले महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. परंडा शहरातील कोटला मैदानाच्या प्रांगणात रविवारी (दि. २७) हे शिबीर घेण्यात येत आहे.
या महाआरोग्य शिबिराच्या जय्यत पुर्वतयारीची पहाणी पालकमंत्री सावंत यांनी शनिवार ( दि. १९ ) केली व अधिकाऱ्यांकडून तयारीपूर्व आढावा घेतला. तसेच आवशयक आशा सुचना केल्या.
यावेळी सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात सर्व नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी व त्यासाठीची औषधे, वैद्यकीय साहित्य, शस्त्रक्रिया या पूर्णतः मोफत केल्या जाणार आहेत.
डोळयांची तपासणी, रक्तक्षय, हृदयरोग तपासणी, कान नाक-घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, ईसीजी तपासणी, सिकल सेल तपासणी, दंत तपासणी, रक्त गट तपासणी, चष्म्यांचे वितरण व औषध वितरण इत्यादीबाबत मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, राज्यस्तरीय नियोजन अधिकारी डॉ. धर्मेंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिल चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे, परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर, मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, डॉ . देवदत्त कुलकर्णी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी या शिबीरासाठी परिश्रम घेत आहेत.