पुणे : पुण्यात उपचारादरम्यान रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे (ब्रेनडेड) त्याचवेळी डॉक्टरांनी केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला त्याची आई आणि त्याचा २२ वर्षीय मोठ्या भावाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पाच रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. ब्रेनडेड तरुणाचे हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांचे गरजू रुग्णांना अवयवदान करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, लग्नावरून परत घरी जात असताना १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघात गुरुवारी (ता. १६) फलटण परिसरात झाला. त्याला तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविले. रुग्ण सुरुवातीला उपचारांना प्रतिसाद देत होता. पण, त्यानंतर त्याचा प्रतिसाद कमी झाला. डॉक्टरांनी आठ दिवस त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.
अपघातात जखमी झालेला मुलगा पाच वर्षांचा असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले होते. त्याचा २२ वर्षांचा मोठा भाऊ आणि आई यांना रुग्णालयाने अवयव दानाचे आवाहन केले. इतके मोठे संकट कोसळले असतानाही आई आणि भावाने अवयवदानास परवानगी दिली. त्यामुळे त्या तरुणाने जगाचा निरोप घेताना पाच जणांना नवे जीवनदान दिले.
दरम्यान, ५२ वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ३९ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून फुफ्फुस प्रत्यारोपण केले. एका ५३ वर्षीय पुरुषाला यकृत मिळाले. तर, एक मूत्रपिंड आणि स्वादूपिंड हे अवयव वयाच्या पस्तिशीत असलेल्या पुरुषावर प्रत्यारोपित केले. या सर्व शस्त्रक्रिया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आल्या. दुसरे मूत्रपिंड सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयातील ४७ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित केले.
तरुणाचे हृदय, फुप्फुस, यकृत डी. वाय. पाटील रुग्णालयात अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना देण्यात आले, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक (झेडटीसीसी) आरती गोखले यांनी दिली. सोलापूर येथील एका रुग्णामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती डीपीयू हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव यांनी दिली.