मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत होती. त्यानंतर आता बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’नुसार, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर 485 रुपयांनी वाढून 76,175 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्याची किंमत 75,690 रुपये प्रति दहा ग्रॅम होती.
चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली. चांदीच्या दरात 33 रुपयांनी घसरण होऊन दर 88,430 रुपये किलो झाला आहे. यापूर्वी चांदीचा भाव 88,463 रुपये होता. त्याचवेळी, 23 ऑक्टोबर रोजी चांदीने 99,151 रुपये आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने 79,681 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मोठ्या तेजीनंतर सोन्यामध्ये घसरण होणे अपेक्षित होते. मात्र, वाढ होताना दिसत आहे.
सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम किंमत 74 हजार रुपयांच्या खाली येण्यास फारसा वाव नसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनने व्याजदरात कपात केली आहे. यामुळे गोल्ड ईटीएफची खरेदी वाढेल. अशा स्थितीत पुढील वर्षी 30 जूनपर्यंत सोने 85 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 76,470 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 70,780 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,590 रुपयांवर गेले आहेत.