पुणे : शिवाजीनगर येथील घारपुरे निवासस्थानाच्या परिसरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जेनेटिक लॅब उभारण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या पुढाकारातून या लॅबचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज (ता.११) शुक्रवारी करण्यात येणार आहे. कर्करोगावर औषध, उपचारपध्दतीतील संशोधनाला चालना मिळावी आणि सामान्य लोकांना चाचण्या रास्त दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या लॅबची उभारणी करण्यात आली आहे.
तसेच, या लॅबमध्ये डाऊन सिंड्रोमसारख्या समस्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या गर्भवती मातांची तपासणी (एनआयपीटी) प्रयोगशाळेत केली जाणार असून तपासणीतील नमुन्यावरून बाळामध्ये काही व्यंग्य असेल की नाही, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. महिन्याला अशा पध्दतीच्या ७०० हून अधिक तपासण्या करणे शक्य होणार आहे, अशी माहिती मॉलिक्युलर ऑनकॉलॉजिस्ट डॉ. अनुराधा चौगुले यांनी दिली आहे.
दरम्यान, टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या अहवालानुसार दर वर्षी कर्करोगाच्या ७० हजार रुग्णांचे निदान होते. त्यापैकी ३० ते ४० टक्के तपासण्या प्रयोगशाळेत होऊ शकतात. शासकीय रुग्णालयांकडून आलेल्या नमुन्यांची तपासणी अल्प दरात येथे होऊ शकणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत ही राज्यातील पहिली प्रयोगशाळा आहे. कॅन्सरशी संबंधित संशोधनावर प्रयोगशाळेत भर दिला जाणार आहे.