दीपक खिलारे
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज व कर्मयोगी स्व. शंकररावजी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर शहरातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि.१८ ) भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गोल्ड कार्ड (आभा कार्ड) मोफत काढण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेते स्वप्निल सावंत यांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
स्वप्नील सावंत म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारत सरकारच्या माध्यमातून शिबिरात लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मोफत काढला जाणार आहे. तसेच या योजनेत १३ हजार रुग्णालयांचा समावेश असून अनेक गंभीर आजारांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत.
आयुष्यमान भारत योजनेत केंद्र सरकारकडून गरजू कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येतो. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे.
या शिबीराचा, योजनेचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी केले आहे.