पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यात महिलांना आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून कुटुंबाचीही जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यांना एकप्रकारे तारेवरची कसरतच करावी लागत आहे. त्यामुळे महिलांच्या शारीरिकसह मानसिक विकासावरही परिणाम होताना दिसत आहे. त्या दृष्टिकोनातून महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे हे अत्यावश्यक बनले आहे.
महिलांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिलांना रक्ताशयाचे विकार, पाळीचे आजार, पोटाचे विकार इत्यादी समस्या उद्भवतात. त्यावर वेळीच तपासण्या करून उपचार घेणे महत्त्वाचे असते. सध्या महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार म्हणजे स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर. याचे प्रमाण वाढत आहे. आता अनेक ठिकाणी याच्या तपासण्या देखील केल्या जातात. तसेच गरोदर महिलांची तपासणी करून त्यांच्यावर प्रसूतीदरम्यान आवश्यक उपचार देखील केले जातात. नंतर त्यांची प्रसूती देखील केली जाते. जर प्रसूतीदरम्यान काही गुंतागुंत आढळल्यास त्यांना ससून हॉस्पिटल संदर्भ सेवा दिली जाते.
प्रसूतीनंतर महिला व त्यांच्या नवजात अर्भकांची विशेष काळजी घेतली जाते. बाळांचे शासनाच्या वेळापत्रकानुसार नियमित लसीकरणही केले जाते. प्रसूतीनंतर अनेक मातांना स्तनपान कसे करावे याची नीट पद्धत माहिती नसते. अशा मातांना स्तनपानाची माहितीही दिली जाते आणि स्त्रियांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन देखील केले जाते. याशिवाय, स्त्रियांना स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये, यासाठी भेसळ असलेले अन्नपदार्थ, बेसरीचे तेल इत्यादींचा आहारामध्ये समावेश करू नये, यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय, केमिकलयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करू नये. ते टाळावेच. तर काही लक्षणे आढळून आल्यास वर्षातून एकदा डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल.
मागील वर्षभरात सुमारे २५० यशस्वी प्रसूती
२०२३ या वर्षभरामध्ये जवळपास २५० यशस्वी प्रसूती झाल्या. तर १९० कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या. डॉ. डी. जे. जाधव आणि डॉक्टर मनीषा भंगाळे यांच्यासह सर्व आरोग्यसेविका यांचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय, गरोदर माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, राष्ट्रीय कार्यक्रम, सर्व साथीचे आजार, रक्तदाब तपासणी व मधुमेह रुग्ण तपासणी इत्यादी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर येथे दिल्या जातात.
– रुपाली भंगाळे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर