‘संडे हो या मंडे, रोज खावो अंडे’ असे आपण अनेकांनी ऐकले असेल. तसे हे खरेच आहे. कारण, अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जातात. अनेक लोकांच्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असते. मात्र, प्रथिने ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असतात. प्रथिने ही शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्यांना ओळखले जाते. शिवाय, अंडी ही मांस आणि इतर डेअरी प्रॉडक्टसच्या तुलनेत किंमतीने स्वस्त असतात.
अंड्यातील पिवळा बलकही चांगला फायदेशीर असतो. या पिवळ्या बलकामध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’ आणि ‘डी’, रायबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस, ल्युटेन आणि कोलाईन यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. अंड्यांमध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असल्याने ते वजन कमी करण्यात मदत करतात. अंड्यांचे सेवन केल्यानंतर आपले पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे भूक लागत नाही. वाढत्या वयासोबतच अनेकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अंड्यांमध्ये ल्युटेन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.
तसेच अंडे खाल्ल्याने रक्तदाब वाढण्यापूर्वीच नियंत्रणात राहतो. स्मरणशक्ती वाढते, मानसिक संतुलन टिकून राहते. तसेच हा ‘व्हिटॅमिन डी’चा नैसर्गिक स्रोत आहे. अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स हा गुणधर्म असल्याने हृदयविकार व कॅन्सरचा धोका टळण्यास मदत होते. शरीराच्या आरोग्याप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीही अंडे लाभदायक ठरते.