पुणे : महापालिकेने अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी केलेली तरतूद संपुष्टात आल्याने शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेंतर्गत नागरिकांना मोफत औषधे मिळणे बंद झाले आहे. परिणामी रुग्णांचे हाल होत असल्याने आरोग्य विभागाने वर्गीकरणाद्वारे दहा कोटी रुपयांची मागणी केली आहे.
निधी मिळाल्यास पंधरा दिवसांत औषधे उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे याने दिली.
महापालिकेतर्फे शहरी गरीब योजना व अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेंतर्गत पात्र नागरिकांना मोफत औषधे दिली जातात. त्यापोटी आरोग्य विभागाला वर्षाला ४० कोटी रुपये खर्च येतो. पालिकेने यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
मात्र, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच हा निधी संपुष्टात आला. त्यामुळे नागरिकांना मोफत औषधे पुरविण्यासाठी आरोग्य विभागाने वर्गीकरणाद्वारे दहा कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यासाठी वित्तीय आणि स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, योजनेंतर्गत गरजू रुग्ण मधुमेहापासून कॅन्सरपर्यंतच्या रोगांवरची औषधे घेतात. कॅन्सर, किडनीविकारावरील औषधे महाग असतात. ही औषधेही महापालिकेच्या माध्यमातून मोफत उपलब्ध होतात.
त्यामुळे रुग्ण नियमितपणे पालिकेच्या योजनेद्वारा औषधे घेतात. आता औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.