पुणे: “दाढ काढली की डोळे कमकुवत होतात”, “दृष्टी जाते” किंवा “डोळ्यांवर मोतीबिंदू येतो”… असे आपण अनेकदा आपल्या घरातील मोठ्यांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून ऐकतो. यामुळेच दाढेत प्रचंड वेदना होत असूनही अनेक रुग्ण ती काढण्यास टाळाटाळ करतात. पण दाढ काढण्याचा आणि डोळ्यांचा खरोखर काही संबंध असतो का? यामागचे वैद्यकीय वास्तव काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

डोळ्यांवर परिणाम होतो हा केवळ ‘भ्रम’?
वैद्यकीय विज्ञानानुसार, दाढ काढल्यामुळे दृष्टी कमी होणे किंवा डोळे खराब होणे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. मानवी शरीरात दात आणि डोळ्यांच्या मज्जासंस्था वेगवेगळ्या असतात. दाढ काढल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर कोणताही कायमस्वरूपी परिणाम होत नाही.

मग ही भीती लोकांच्या मनात कशी आली?
यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत, ज्याचा लोकांनी चुकीचा अर्थ लावला आहे. वरच्या जबड्यातील दात आणि डोळ्यांच्या खालील भागाला ‘ट्रायजेमिनल’ नावाची एक मोठी नस संवेदना पुरवते.

दाढ काढल्यानंतर गालावर आणि डोळ्याच्या खाली काही काळ सूज येते. यामुळे डोळा लहान झाल्यासारखा वाटतो किंवा दृष्टीवर ताण पडतो, ज्यामुळे लोकांना वाटते की, डोळ्यावर परिणाम झाला आहे.
केव्हा धोका असू शकतो?
दाढेत झालेला संसर्ग जर खूप वाढला, तर तो सायनसच्या माध्यमातून डोळ्याच्या खालच्या भागापर्यंत पोहोचू शकतो. याला ‘सेल्युलायटिस’ म्हणतात. अशा वेळी डोळ्याला धोका पोहोचू शकतो, पण हे दाढ काढल्यामुळे नसून ‘संसर्गावर उपचार न केल्यामुळे’ घडते.
दंतवैद्यांच्या मते, दाढ काढल्यानंतर येणारा जडपणा हा तात्पुरता असतो. दाढ काढणे टाळल्याने होणारा संसर्ग मात्र डोळ्यांसाठी जास्त घातक ठरू शकतो.







