आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण काही आजार हे उद्भवताना दिसून येतातच. त्याची कारणेही अनेक असू शकतात. त्यात रक्तदाब अर्थात ‘ब्लड प्रेशर’ची समस्या सध्या अनेकांना जाणवते. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार हे त्यामागचे कारण आहे. मात्र, याच ‘बीपी’कडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
बीपी कोणताही असो ‘हाय बीपी’ की ‘लो बीपी’ पण ते घातकच ठरतं. त्यामुळे योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखणे, चक्कर येणे, चेहरा लाल होणे, धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, अस्पष्ट दृष्टी, लघवीतून रक्त येणे, थकवा, तणाव, हृदयाचे वाढलेले ठोके, डोकेदुखी आणि नाक वाहणे इत्यादी समस्या जाणवू शकतात. उच्च रक्तदाबाच्या आजारामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. जर रक्तदाब बराच काळ सतत उच्च राहिल्यास त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात.
उच्च रक्तदाब होण्यासाठी चुकीचा आहार आणि बिघडलेल्या जीवनशैली हे कारणीभूत ठरते. बीपीचा वाढणारा हा आजार नियंत्रणात न राहिल्यास हृदय, किडनी आणि मेंदूला इजा होऊ शकते. पण या आजारासाठी वय जबाबदार नसल्याचं अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. रक्तदाब वाढण्यासाठी मिठाचे अतिरिक्त सेवन कारणीभूत ठरू शकते. सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरातील रक्तदाबाची पातळी वाढते.