डायबिटीज अर्थात मधुमेह ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत आहे. ज्याला तरुणाई देखील बळी पडताना दिसत आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नेहमीपेक्षा जास्त राहते, जी नियंत्रित न केल्यास डोळे, हृदय, मज्जासंस्था यांसारख्या शरीराच्या अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येकाला सतत आपल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
टाईप-2 मधुमेहाचा धोका जगभरात सर्वाधिक असल्याचे दिसून येत असले, तरी लहान मुलेही टाइप-1 मधुमेहाचे बळी ठरू शकतात. जागतिक स्तरावर वाढणाऱ्या या गंभीर आणि जुनाट आजाराबद्दल लोकांना जागरुकता आणण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो.
मधुमेहाची पातळी काय असावी?
जगभरात 537 दशलक्ष (53.7 कोटी) पेक्षा जास्त लोक मधुमेहाचे पीडित आहेत. मधुमेह ही अशी समस्या आहे, जी जेव्हा तुमच्या रक्तातील साखर नेहमीपेक्षा जास्त राहते तेव्हा होतो. उपवासातील ग्लुकोजची पातळी 70 ते 100 मिलीग्राम प्रति डेसीलीटर (mg/dL) दरम्यान आणि 125 mg/dL (6.9 mmol/L) किंवा त्याहून अधिक साखरेची पातळी मधुमेह अर्थात डायबिटीज मानली जाते.
मधुमेह कसा ओळखावा?
मधुमेहाच्या सामान्य लक्षणांकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. जास्त तहान आणि कोरडे तोंड, वारंवार लघवी होणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, अचानक वजन कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणे, अंधुक दिसणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.