अॅलर्जी हा शब्द आपण कधीना कधी ऐकला असेलच. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर काही समस्या निर्माण होते, त्याला अॅलर्जी म्हटले जाते. काहींना धुळीपासून तर काहींना वातावरणाची अॅलर्जी असू शकते. या अॅलर्जीची कारणं अनेक असू शकतात. त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे.
डोळे लाल होणे, शिंका येणे, नाक वाहने यांसारख्या समस्या अॅलर्जी असल्यास अनेकांना उद्भवू शकतात. अॅलर्जीने ग्रासलेले रुग्ण बरे होण्यासाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर करतात. मात्र, रुग्णांना योग्य असा परिपूर्ण फायदा होत नाही. यामुळे रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न सतावत असतात. नियमित आहार न घेतल्याने ही समस्या उद्भवू शकते.
तसेच वातावरणातील बदलाने वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा प्रकोप होतो. या त्रिदोषांच्या प्रकोपामुळे नाकाच्या आतील भागात सूज निर्माण होते. तो भाग नाजूक बनतो. जेव्हा रुग्ण थंड वातावरण, उग्र वास, धूळ, धूर, सुगंधी द्रव्य इत्यादींच्या संपर्कात येतो. तेव्हा त्याचा सहवास नाकाला सहन होत नाही. शरीर त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिकार करत असताना अॅलर्जीचे लक्षणे तीव्र स्वरुपात जाणवू लागतात.
ही असू शकतात अॅलर्जी वाढण्याची कारणे
अति आंबट पदार्थ (दही, चिंचेचे आंबट आंबवलेले पदार्थ), थंड पदार्थ (शीत पेय), अति गोड पदार्थ (आईस्क्रीम, श्रीखंड इत्यादी), गुरु आहार (मोड आलेले धान्य, कच्चा सॅलड, शिळे अन्न, कच्ची फळे, फास्ट फूड, बेकरी पदार्थ) यांच्या सेवनाने अॅलर्जीचे प्रमाण वाढू शकते.