नागपूर : नवीन आरोग्य केंद्रांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. थेट सावंत यांनी कारवाई केल्याने सर्वानीच भुवया उंचावल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने तो, नामंजूर करण्यात आला होता. प्रस्ताव पुन्हा सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बऱ्याचदा पत्रव्यवहार केला होता, मात्र अजूनही परिपूर्ण प्रस्ताव अजूनही सादर झालेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधिमंडळात दिली. त्यानंतर सावंत यांनी तातडीने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई आदेश दिले.
राज्यातील नागरिकांचे आयोग्य महत्वाचे असून आरोग्य गरजा सातत्याने वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासाठी पदभरती, यंत्रसामुग्री, आदी गोष्टींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सर्वंकष कृती आराखडा करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी स्पष्ट केले.