वाढतं वजनही एक गंभीर समस्या बनू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. त्यासाठी काहीना काही विशेष असे प्रयत्न केले जातात. पण अनेकदा यातून फरक काही जाणवत नाही, असे बऱ्याच जणांचे होते. जास्त वजन किंवा लठ्ठपणाची समस्या शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहे.
वाढलेल्या वजनामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे गंभीर आणि जुनाट आजार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांकडून सर्वांना वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा असतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम केवळ स्नायूंना बळकट करण्यात आणि शारीरिक शक्ती वाढवण्यास मदत करत नाहीत तर वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करतात. रोजच्या रुटीनमध्ये त्याचा समावेश करून वजन कमी करता येते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नियमित शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोपही महत्त्वाची असते. ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना वजन कमी करण्यात अडचण येते. झोपेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे वजन वाढण्याचा धोकाही वाढतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे.
फास्ट फूड, जास्त कॅलरीज घेणे टाळाच
वजन कमी करण्यासाठी, व्यायाम आणि इतर शारीरिक हालचालींसोबत आहार सुधारणे खूप महत्वाचे असते. जास्त खाणे, अन्नातून जास्त कॅलरीज घेणे, प्रक्रिया केलेले किंवा फास्ट फूड खाणे, साखरयुक्त पदार्थ खाणे यामुळेही वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे हे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.