लहू चव्हाण
पाचगणी : दांडेघर (ता. महाबळेश्वर) गावातील देवस्थानाच्या वैयक्तिक कुळाच्या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ही जमीन परस्पर विकण्याचे करारनामे करून दांडेघर ग्रामस्थांची कोर्टाची व इतर शासकीय कार्यालयाची दिशाभूल करून वैयक्तिक लाभासाठी फसवणूक केल्याचे निवेदन दांडेघर ग्रामस्थांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, सुहास लक्ष्मण वाकडे, रविराज गजानन जोशी दोघेही रा. पुणे) अशोक गायकवाड (रा.वाई) आणि पुनम कांबळे – गोळे (रा. सिध्दार्थ नगर पांचगणी) यांचे विरुद्ध दांडेघर गावातील देवस्थानाच्या, वैयक्तिक कुळाच्या जमिनी प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सुद्धा या जमिनी परस्पर विकण्याचे करार करून दांडेघर ग्रामस्थांची, कोर्टाची व इतर शासकीय कार्यालयाची दिशाभूल करून वैयक्तिक लाभासाठी फसवणूक केली आहे.
सुहास वाकडे गुरुप्रसाद, रविराज गजानन जोशी यांच्यातील समजूती करारनाम्यान्वये केदारेश्वर देवस्थानचा तसेच वैयक्तिक कूळ असलेल्या ग्रामस्थांच्या जमिनी न्यायालयात तसेच महसूल मंत्री यांच्याकडे दावे न्यायप्रविष्ठ असताना तिरहाईत इसमांचे हक्क प्रस्थापित करून त्यातून वैयक्तिक लाभ करून घेतलेला आहे. तसेच २०१९ साली झालेल्या करारनाम्याप्रमाणे सुहास वाकडे, रविराज जोशी यांनी अशोक गायकवाड व पुनम कांबळे-गोळे यांचेशी मिळकत सर्वे नंबर १० मौजे दांडेघर ता. महाबळेश्वर येथील थापा पॉइंट किंवा हॅरिसन फॉली या नावाने प्रसिद्ध असलेल्या जमिनीचा ऐक कोटीचा करारी व्यवहार केला आहे. यामध्येही गावाची फसवणूक केलेली आहे.
वरील केलेले सर्व करारनामे हे संपूर्णपणे बेकायदेशीर असून पूर्वांपार कुळ असलेल्या दांडेघर ग्रामस्थांची फसवणूक तसेच केदारेश्वर देवाच्या मिळकतींचे परस्पर हस्तांतरण करून न्यायालयाचा तसेच इतर शासकीय कार्यालयाचा अवमान केला आहे. त्यामुळे आम्ही पूर्वंपार येथील रहिवासी असताना आम्हाला बेघर करण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाची चौकशी करून वरील चौघांवर फौजदारी कारवाई करावी असे शेवटी म्हंटले आहे. या निवेदनावर ११० ग्रामस्थांच्या सह्या असून अख्खा गावच विकानाऱ्याविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, सुहास वाकडे व रविराज जोशी यांनी संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यालाच सुरुंग लावण्याचा प्रकार चालू केला असून तालुक्यातील महाबळेश्वर लिंगमळा ,प्रतापगड, वेण्णा लेक, आर्थरसीट पॉइंट आदी परिसरातील जमिनी विकण्याचे अमिष देऊन काही जणांची फसवणूक केली आहे. याप्रकरणात ही त्यांचेवर पोलीस तक्रार आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, “दांडेघर गावच्या जमीनविक्री व्यवहाराशी माझा कसलाही संबंध नसून वाकडे यांचेकडून मी रीतसर कागदोपत्री फक्त सर्वे नंबर १० (थापा) भाडेपट्ट्यावर चालवण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे गावाच्या विक्री प्रकरणाशी माझे नाव विनाकारण गोवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी चालवला आहे.”