वॉशिंग्टन : गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढते, असे अनेक महिलांचे ठाम मत असले तरी संशोधकांना वारंवार प्रयत्न करूनही गर्भनिरोधक औषधी आणि वजनवाढ यातील संबंधाचा छडा लावता आलेला नाही. तथापि, एका नव्या संशोधनातून गर्भनिरोधक गोळ्या घेत असलेल्या काही महिलांचे वजन वाढते आणि त्यासाठी त्यांची जनुके कारणीभूत असतात, असे समोर आले आहे.
गर्भनिरोधक गोळ्या व जनुकांतील संबंधाबाबतची वाढलेली ही समज महिलेनुरूप परिणामकारक गर्भनिरोधक औषधे विकसित करण्याचा मार्ग प्रशस्त करेल. संप्रेरकांवर (हार्मोन) आधारित औषधे (जसे की गोळ्या, इम्प्लान्ट किंवा विविध प्रकारच्या कॉइल) स्त्रीबीज निर्मितीच्या प्रक्रियेस प्रतिबंध करतात, त्याचबरोबर योनीला गर्भाशयाला जोडणाऱ्या ग्रीवा भागातील श्लेष्मा घट्ट करतात. त्यामुळे शुक्राणूंचा गर्भाशयातील प्रवेश रोखला जातो. अनेक महिला गर्भ न राहिल्यामुळे खूश असतात. तथापि, काहींना प्रतिबंधात्मक औषधे घेऊनही गर्भ राहतोच.