Coconut Water Benefit : पुणे : नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला आवर्जून नारळ पाणी प्यायला दिले जाते .आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा देते. पण, नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहीत आहे का? याच संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असातात. चला तर मग आज आपण नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? ते जाणून घेऊ.
सकाळी १० ही योग्य वेळ
सकाळी १० वाजता फक्त एक ग्लास नारळ पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणास मदत होते, त्वचेचे हायड्रेशन सुधारते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध होतो, असे तज्ज्ञ सांगतात. ‘मेडिकल न्यूज टुडे’च्या अहवालानुसार एक ग्लास नारळ पाण्यात फक्त ४५ कॅलरीज असतात. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला सोडा किंवा इतर शर्करायुक्त पेये घेण्याचा मोह होतो तेव्हा नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळाचे पाणी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील चयापचय किक स्टार्ट करते.
‘या’ लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे?
तुमच्या रक्तात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यास नारळ पाणी पिऊ नका. कारण- नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्यांनी आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी ते पिणे टाळावे, असे डॉक्टर म्हणतात. नारळाचे पाणी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट स्रोत आहे; ज्यामुळे व्यायामानंतर रीहायड्रेशनसाठी तो एक चांगला पर्याय बनतो, अशी माहिती ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या स्किन स्पेशालिस्ट, कॉस्मेटिक स्किन स्पेशालिस्ट व स्किन सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी दिली.
प्रत्येकाची वेगळी वेळ असते
प्रत्येक व्यक्तीवर नारळ पाणी प्यायल्यानंतर दिसणाऱ्या शारीरिक प्रतिक्रिया भिन्न असतात. म्हणून डॉक्टर कपूर यांनी सल्ला दिला की, प्रत्येकाने स्वत:च्या शरीराचे ऐकले पाहिजे आणि आवडी व चवीनुसार नारळ पाणी पिण्याचा आनंद घेतला पाहिजे.