Pune prime News : सध्या हवामानात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी उन्ह तर कधी गार वारं, हेच सध्या अनुभवायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे बनले आहे. पण अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ऋतूमानानुसार, हवामानातील बदल काहींना मानवतो तर काहींची तब्येत बिघडू लागते. अचानक सुरु झालेल्या गरमीमुळे फ्रीजचे पाणी, एसीची थंडगार हवा हा ही बदल अचानकच सुरु होतो. हे बदल जरी सुखावह वाटत असले, तरी अचानक होणारे हे बदल शरीराला अपायकारक ठरू शकतात.
त्यामुळे हवामान बदलत असताना आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गरम जास्त होत असल्याने थंड पाणी प्यावे असे वाटते तेव्हा फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे. साधे पाणी आणि थंड पाणी असे मिसळून प्यायल्यास चांगले होऊ शकते.
विशेषतः घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना फ्रीजमधील एकदम थंड वस्तू खाण्यापासून परावृत्त करावे. तसेच काहीही खाण्यापूर्वी आपले हात स्वछ असतील याची काळजी घ्यायला हवी. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप येणे ही सामान्य बाब झाली आहे. पण असे असले तरीही वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे बनते. असे केल्यास पुढील गंभीर धोका टाळता येऊ शकतो.