युनुस तांबोळी
शिरूर : सध्याचा काळ हा ऋतु बदलाचा आहे. त्यामुळे शिरूर तालुका आणि पश्चिम भागात गेल्या आठ दहा दिवसापासून दिवसा कडक उन्हाच्या झळा तर विशेषतः पहाटे थंडी असे संमिश्र वातावरण आहे. या वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला, घशातील खवखव, डोकेदुखी आदी व्याधी जाणवू लागल्या आहेत.
दिवसभर रणरणत्या उन्हाचे चटके आणि विशेषतः मध्यरात्रीनंतर कमालीचा गारठा अशा दुहेरी वातावरणाची अनुभूती शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. पहाटे भयंकर गारठा जाणवत असल्याने उबदार कपडे परिधान करावे दुपारी बारानंतर उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होते. पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी रणरणत्या उन्हाचा चटका अशा वातावरणाची अनुभूती शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
नोकरदार वर्गाला सकाळी घराबाहेर पडावे लागते. त्यांनाही गारठ्याचा चांगलाच त्रास होत आहे. शारीरिक आरोग्याच्या तंदरूस्तीसाठी सकाळी फिरायला जाणाऱ्या विशेषतः जेष्ठ नागरीकांनी आपल्या वेळेमध्ये बदल केले आहेत. या संमिश्र वातावरणाचा विविध शारिरीक शस्त्रक्रिया झालेल्या नागरिकांसह विशेषतः दमा रूग्णांना जास्तीचा त्रास होऊ लागला आहे.
ऋतुबदलामुळे वातावरणात बदल झाला आहे. अचानक थंडी गायब होऊन आता आपन उन्हाळ्याकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे सर्दी, थंडी, तापाचे रूग्ण वाढले आहे. त्यासाठी तातडीने आरोग्य सल्ला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपचार करून घ्यावेत. : डॉ. नामदेव पानगे, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठे येमाई
सध्या वातावरणात बदल झाल्याने प्रत्येकाला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांनी देखील या वातावरणात आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील थंड पेय, थंड आइस्क्रिम तसेच बाहेरिल पदार्थ खाणे टाळावे. आजारी असल्यास तातडीने वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. : सतीश फिरोदिया, मुख्याद्यापक, जय मल्हार हायस्कूल जांबूत ता. शिरूर