ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करताना राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील शिवाजी मैदान येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आनंदाश्रम सेवा संस्था व रक्तानंद संस्था यांच्या माध्यमातून गेल्या २८ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री करण्यात येते. रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची आनंद दिघे यांची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे घेऊन जात आहेत. अशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत करणारा हा एकमेव उपक्रम असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्याला रक्तकर्ण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
नवीन वर्षाच्या माध्यमातून राज्य प्रगती पथावर जाणार असल्याचे तसेच नवीन प्रकल्प राज्यात सुरु करण्यात येणार आहेत असे सांगून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा झाला होता, तेव्हा ११ हजार नागरिकांनी राक्तदान केले होते. परंतु वैद्यकीय तपासणीनंतर काहींना रक्तदान करता आले नाही, अन्यथा ही संख्या २५ हजारांवर गेली असती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी गेली अडीच वर्ष बंद होता, तो आता पूर्ववत करण्यात आला आहे. केवळ ५ महिन्यात ११ कोटी रुपयांची मदत सुमारे १ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना करण्यात आली आहे. त्याबरोबरीने महात्मा ज्योतिबा फुले योजनेत महागड्या आजारांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. मदतीची मर्यादा देखील वाढविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.