मुंबई : मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलने ब्रेस्ट कॅन्सरवर महत्त्वपूर्ण संशोधन करून यश मिळविले आहे. त्यामुळे महिलांना आता ५० रुपयांत उपचार होऊ शकणार आहेत. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीपूर्वी ट्युमरच्या सभोवती लिग्रोकेन इंजेक्शनमुळे महिलांच्या मृत्यूच्या प्रमाण ३० टक्क्यांनी घटणार आहे. अशी माहिती रुग्णालयाच्या डॉ. शलाका जोशी यांनी दिली आहे.
स्तनाच्या कर्करोगावरील उपचारात रुग्णालयाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. येथील संशोधकाने अशा इंजेक्शनवर संशोधन केले आहे, ज्याच्या एकाच डोसने स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी सुन्न (अचल) होतील आणि या पेशींचा शरीराच्या इतर भागांमध्ये प्रसार थांबवला जाईल. महत्वाची गोष्ट म्हणजे या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत फक्त ४० ते ५० रुपये आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी वरदान म्हणून याकडे पाहिले जात आहे.
२०११ साली टाटा मेमोरियल हॉस्पिटलने ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांच्या उपचारावर एक नवीन अभ्यास सुरु केला होता. या अभ्यासासाठी ३० ते ७० वयोगटातील १६०० महिलांची निवड करण्यात आली. ज्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. ८०० महिलांमधील स्तनाच्या कर्करोगावर एकट्या शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्यात आले. तर दुसऱ्या गटातील ८०० महिलांवर इंजेक्शनसह शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. दोन्ही गटातील महिलांचा नियमित देखरेक करण्यात आली. त्यांचा प्रोटोकॉल केमो, रेडिएशन इ. फॉलो-अपच्या सहाव्या वर्षी, इंजेक्शन वापरणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात ३० टक्के सुधारणा दिसून आली.
दरम्यान, महिलांच्या स्तनाच्या कर्करोगावरील स्वस्त आणि ताबडतोब अंमलबजावणी करण्यायोग्य हा उपचार आहे. हा उपचार कोणत्याही सर्जनकडून केला जाऊ शकतो, हे एका मोठ्या यादृच्छिक चाचणीतून दिसून आले आहे, जे नवीन उपचारांच्या मूल्याचे मूल्यमापन करण्याचे ‘सुवर्ण मानक’ म्हटले जात आहे.