सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. त्यामुळे काही आजार नकळतपणे बळावू शकतात. त्यापैकी एक म्हणजे रक्तदाबाची समस्या. रक्तदाब जास्त असो वा कमी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
रक्तदाबाची समस्या आता फक्त ज्येष्ठांनाच नाहीतर अगदी तिशीतल्या तरूणांना देखील उद्भवू शकते. उच्च रक्तदाब ही अशी समस्या आहे की ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका पॅरालिसिस किंवा किडनीचा आजार होण्याचा धोका वाढतो. जेव्हा तुम्हाला तुमचे डॉक्टर तुमचा रक्तदाब सांगतात, तेव्हा ते दोन नंबर सांगतात त्यातील वरचा नंबर हा ह्रदय आकुंचन होत असताना रक्तवाहिन्यांमध्ये असणारा दाब असतो आणि खालचा नंबर ह्रदय सामान्य असताना रक्तवाहिन्यांमध्ये असणारा दाब असतो. उच्च रक्तदाब म्हणजे वरचा रक्तदाब हा 130 mmhg पेक्षा जास्त आणि खालचा रक्तदाब हा 80 mmhg पेक्षा जास्त असणे.
उच्च रक्तदाबाची लक्षणे नेमकी कोणती?
उच्च रक्तदाबमध्ये सहसा कोणतीही लक्षणे नसतात. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत दुखणे, दम लागणे किंवा धडधड होणे असा त्रास होऊ शकतो. आपल्याला रक्तदाब आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी नियमित रक्तदाब तपासणे गरजेचं आहे.
हे आहेत उच्च रक्तदाबाचे धोके
उच्च रक्तदाब ही ह्रदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजाराचे कारण असते. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो, पक्षाघात होऊ शकतो मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो.
असा ठेवता येईल रक्तदाब नियंत्रणात
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी रक्तदाब कमी होण्यासाठी औषधे दिली असतील तर ती घ्यावीत. जर त्या औषधांनी काही त्रास होत असेल तर ती बंद न करता डॉक्टरांना भेटावे. ते तपासणी करून डोस कमी करतील किंवा औषधे बदलतील. जर किंमत जास्त वाटत असेल तर डॉक्टरांना सांगून औषध बदलून घ्यावे. रक्तदाब कमी होण्यासाठी औषधे नियमित घेणे हे तुम्हाला संभाव्य धोक्यापासून दूर ठेवते.
हे बदल जरूर करा…
आपलं वजन कमी करण्याला प्राधान्य द्या. आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश करा. फळे आणि पालेभाज्या आहारात वाढवा. याशिवाय, सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. नियमित कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. तसेच तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ते थांबवणं गरजेचे आहे.
रक्तदाबाची नियमित करा तपासणी
लक्षणे नाहीत म्हणून उच्च रक्तदाब नाही किंवा वाढलेला रक्तदाब आपल्यासाठी नॉर्मल आहे असं न समजता रक्तदाब नियमित तपासावा. तसेच आपल्या डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यावेत. आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करावेत.
– डॉ. छगन खारतोडे, वैद्यकीय सल्लागार, विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर