नवी दिल्ली : खोकला आला की आपण अनेक कफ सीरपचा वापर करत असतो. अनेकदा याचा चांगला परिणामही जाणवतो. पण भारतात विकल्या जाणाऱ्या 50 पेक्षा जास्त कंपन्यांचे कफ सीरप गुणवत्ता चाचणीत अक्षरश: ‘फेल’ झाल्याची माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे.
भारतात उत्पादन करण्यात आलेल्या कफ सीरपमुळे जगभरात आत्तापर्यंत जवळपास 141 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच आले आहे. आता सीरपची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उझबेकिस्तानात कफ सीरप प्राशनाने 19 मुलांचा मृत्यू झाला होता. हा सीरप दिल्लीजवळील नोएडातील एका कंपनीने बनविला असल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून भारतातील कफ सीरप उत्पादनावर लक्ष केंद्रित झाले.
याबाबत ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ने एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये 2104 चाचणी अहवालांपैकी 54 कंपन्यांचे 128 अहवाल मानक दर्जाचे नव्हते. गुजरातच्या अन्न आणि औषध प्रयोगशाळेने ऑक्टोबरपर्यंत 385 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 20 उत्पादकांचे 51 नमुने मानक दर्जाचे नसल्याचे आढळले.