पुणे प्राईम न्यूज डेस्क: महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पूजा करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्यावी.
भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्पारीगिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये (टॉक्जीन) तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्नातून विषबाधा होऊ शकते. बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेताना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.
भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतो भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
याशिवाय, भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन-तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे, अशाप्रकारची काळजी घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.