मुंबई : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण ५०० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरु केला जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरु करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मुंबई पाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी ‘आपला दवाखाना’ सुरु होणार आहे. सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात येईल. मुंबईत सुरु केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरु झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.