पुणे प्राईम न्यूज डेस्क: हिवाळ्यात अनेकदा त्वचा कोरडी पडू लागते. त्यात सर्वाधिक त्रास होतो तो कोरड्या ओठांचा. या ओठांची योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे होऊ लागतात आणि त्यावर क्रस्ट्स तयार होणे सामान्य गोष्ट आहे. कमी तापमानाचा आपल्या त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते.
थंड हवा आणि कमी पाण्यामुळे ओठ फुटतात. पण, या फुटलेल्या ओठांसाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. फुटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. रात्रभर किंवा दिवसा ओठांवर खोबरेल तेल लावल्याने ओठ बरे होण्यास मदत होते. याशिवाय मध एक चांगला एक्सफोलिएटर आहे आणि ओठांना ओलावा देखील देतो. ऑलिव्ह ऑईल मधात मिसळून ओठांवर लावावा. काही वेळाने ओठ धुवून स्वच्छ केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
तसेच जर तुमचे ओठ काळवंडले असतील तर लिंबाचा रस साखरेत मिसळून रात्रभर लावल्याने फरक दिसून येऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने ओठ धुवा. याशिवाय दुधासोबत तयार केलेली हळदीची पेस्ट साधारण 5 मिनिटे लावल्यास चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.