सध्या स्पर्धेच्या युगात अनेकदा आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देणं जमत नाही. त्यात खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मोठ्या प्रमाणात लोक पोटाच्या समस्यांना बळी पडत आहेत. या समस्यांमध्ये ॲसिडिटीचाही समावेश होतो. ही समस्या सामान्य वाटत असली तरी काहीवेळा ती वेदनादायक ठरू शकते.
ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला होत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ॲसिडिटी टाळण्यासाठी योग्य खाण्याच्या सवयी ठेवणे आवश्यक आहे. मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत. ॲसिडिटी टाळण्यासाठी तुम्ही औषधांऐवजी काही पदार्थ खाऊ शकता. त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. बदाम खाण्याचा सल्ला तुम्हाला दिला जात आहे. कारण, बदामामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्हाला वारंवार काहीही खाण्याची इच्छा होत नाही आणि ॲसिडिटीपासून मुक्ती मिळते.
याशिवाय बदाम पोटात असलेले ॲसिड शोषून घेतात आणि छातीत जळजळ होण्यापासून आराम देतात. पुदिन्याची पाने हीदेखील प्रभावी मानली जातात. पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्याने पोट थंड होण्यास मदत होते. जर तुम्हाला ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होत असेल तर तुम्ही पुदिन्याच्या पानाची चटणी खाऊ शकता. याचे सेवन केल्याने पोटात ताजेपणा येतो. पोट आणि छातीत जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.