पुणे : रक्त आणि रक्तामधील घटक (रेड सेल्स) यांच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. सरकारी रक्तपेढय़ांत ५० रुपयांनी, तर खासगी रक्तपेढय़ांत १०० रुपयांनी दरात वाढ होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच जाहीर केला असून ही दरवाढ तब्बल आठ वर्षांनंतर करण्यात येणार आहे.
रक्त संकलन आणि साठवण्यासाठी रक्तपेढय़ांचा खर्च वाढला असल्याने ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय महाविद्यालय संलग्न सरकारी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना रक्त व रक्तघटक मोफत उपलब्ध करून देण्याची सवलत सुरूच राहणार आहे. यामुळे ‘रेड सेल’चे दर १०० रुपयांनी वाढविण्यात आले असले तरी इतर घटकांचे दर वाढलेले नाहीत. परिणामी, रुग्णांना फार आर्थिक फटका बसणार नाही.
दरम्यान, कर्करोग, डायलिसिस, बायपास सर्जरी अशा रुग्णांना जास्त प्रमाणात रक्ताची गरज लागते. त्यामुळे अशा रुग्णांचा विचार करता, त्यांना काही सवलत मिळणे आवश्यक होते. मात्र, कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.
रुग्णांना कमी दरात रक्त मिळावे म्हणून रक्तपिशव्यांच्या बॅगवरील जीएसटी कमी करायला हवा, असून अशी जोरदार मागणी होत आहे. मात्र, या निर्णयामुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.