लोणी काळभोर (पुणे) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिंरगा” या मोहीमेअंतर्गत संपुर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे आर्थिक परीस्थिती नसल्याने आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील तीन दिवसाची ओली बाळंतीन व तिच्या तिन दिवसाच्या मुलाला उपचार मिळावेत यासाठी कुंजीरवाडीपासुन, ससुन, औंध यासारख्या शासकीय रुग्नालयाचे उंबरे झिझवावे लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
पडत्या पावसात ओली बाळंतीन व तिचे तीन दिवसाचे बाळ ससुन, कुंजीरवाडी, औंध यासारथ्या शासकीय रुग्नालयाच्या दारात उपचारासाठी दयेची भिक मागत असतांना, तिनही रुग्नालयानी मुलाच्या उपचारासाठी जागा शिल्लक नसल्याच्या कारणावरुन हाकलुन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. अखेर शिवसेना पुणे उप ज़िल्हा प्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी या प्रकरणात हालचाल केल्या तब्बल बहात्तर तासानंतर ओली बाळंतीण व तिच्या तीन दिवसाच्या मुलावर औंध येथील शासकीय रुग्नालयात कांही वेळापुर्वी उपचार सुरु झाले आहेत.
रुक्मीणी शिवाजी पात्रे हे त्या हालअपेष्ठा झालेल्या अभागी महिलेचे नाव आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगक अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचा डंका पिटणाऱ्या पुण्यासारख्या शहराजवळ, तिन दिवसाच्या ओल्या बाळंतणीची व तिच्या मुलाची झालेली हालअपेष्ठा काळीमा फासणारी आहे. या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवर चौकशी होऊन, आळंदी येथील वरील कुटुंबाला योग्य ती न्याय मिळावी अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी केली आहे.
पुणे-सोलापुर महमार्गापासुन आळंदी म्हातोबा हद्दीतील कोळस्कर वस्तीवर नामदेव देढे व त्यांचे वडील व आई मागिल वीस वर्षापासुन राहतात. नामदेव देढे याची मोठी बहिण रुख्मिणी शिवाजी पात्रे गरोदर असल्यामुळे, बाळंतपणासाठी देढे यांच्याकडे आली होती. रुक्मीनीला सातव्या महिणा लागला असला तरी, तीन दिवसापुर्वी तिच्या पोटात कळा येऊ लागल्या होत्या. भर पावसात रुक्मीनीला दवाखान्यात नेण्यासाठी चार चारचाकी वाहन नसल्याने, आसपासच्या महिलांनी घऱीच बांळतपण केले.
रुक्मीनीचे सातव्या महिन्यातच बाळंतपण झाले असल्याने, तिला झालेल्या बाळाचे वजन कमी भरले. यामुळे बाळाला व तिच्या आईला उपचाराचीगरज असल्याने, देढे कुटुंबियांनी रात्रींच्या अंधारात ओली बाळंतीन व तिच्या बाळाला कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नेले मात्र त्या ठिकाणी बाळाला ठेवण्यासाठीकाचेची पेटी नसल्याने, तेथील कर्मचाऱ्यांनी रुक्मीनीला व तिच्या बाळाला उपचारासाठी ससूनला घेऊन जावे लागेल असे सांगीतले.
दरम्यान, बाळ वाचवणे गरजेचे असल्याने, देढे कुटुंबियांनी मध्यरात्रीच्या सुमारास मिळेल त्या वाहणाने पुण्यातील ससुन गाठले. मात्र ससुनमध्येही बाळासाठी ICU बेड शिल्लक नाही असे सांगत तेथील कर्चाऱ्यांनी ओली बाळंतीन मुलाला परत पठवुन दिले. गरिबीच्या घरी जन्म घेऊन चूक केलेल्या नवजात बालकास जीवन मृत्यूची लढाई लढण्यासाठी अखेर नाईलाजाने घरी आणावे लागले दोन दिवसांपासून हे बाळ घरीच होते. पण ते काहीच खात नाही पीत नाही आणि घरी राहिले तर जास्त काळ टिकणार नाही याची जाणीव होताच रुक्मीनीचा भाऊ नामदेव देढे व मजूर कुटुंबीयांनी स्वप्नील कुंजीर यांचे घरगाठले. व त्यांच्याकडे मदतीची याचना केली. स्वप्निल कुंजीर यांनी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे यांच्या मदतीने पुण्यातील औंध रुग्नालयात दाखल केले.
याबाबत बोलताना स्वप्निल कुंजीर म्हणाले, तिन दिवसाची ओली बाळंतीन व तिच्या मरणाच्या दारातील बाळावर उपचार न होणे ही बाब पुण्याच्या प्रतिमेला न शोभणारी आहे. ससुन रुग्णालयाने वरील महिलेला उपचाराशिवाय परत पाठवणे ही बाब अतिशय चिड आनणारी आहे. तसेच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी महिला पहिल्या वेळेस प्राथमिक आरोग्य केंद्रात आली त्यावेळी तिला उपचारासाठी मदत करण्याबरोबरच, रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायला हवी होती, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई होण्याची गरज आहे.