पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित केले आज आहे. तसेच भारतीय कुक्कुटपालनाचे जनक डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त देशव्यापी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
‘नॅशनल चिकन डे’ बुधवारी (ता.१६) साजरा करण्यात येणार आहे. ‘सामान्य नागरिकांत चिकनबाबत जनजागृती व्हावी,’ या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्ताने १६ ते १८ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत शहरातील ७५ दुकानांतून सवलतीच्या दरात चिकनचे वितरण केले जाईल, अशी माहिती पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जागृतीपर कार्यक्रम, स्वस्त दरात चिकन विक्री, व्याख्यान, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन या जागृती अभियानात करण्यात येत आहे.
पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर असोसिएशन महाराष्ट्र, कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स ब्रीडर्स असोसिएशन, पश्चिम बंगाल पोल्ट्री फेडरेशन तसेच इतर अनेक राज्य पोल्ट्री असोसिएशनतर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे सी. वसंतकुमार यांनी सांगितले.
या वेळी डॉ. विजय तिजारे, डॉ. श्रीलंकेश्वर वाघोले, डॉ. अजय देशपांडे आदी उपस्थित होते.