नवी दिल्ली: भारतात सद्यःस्थितीत सुरू असलेले चांदीपुरा व्हायरसचे थैमान हे गत २० वर्षांतील सर्वाधिक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. देशात जूनच्या सुरुवातीपासून १५ ऑगस्टदरम्यान ‘अॅक्यूट इन्फसेलाइटिस सिंड्रोम’ (एईएस) चे २४५ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ४३ जिल्ह्यांत एईएसचे रुग्ण आढळत असून, चांदीपुरा संसर्गाच्या (सीएचपीव्ही) ६४ रुग्णांची पुष्टी करण्यात आली आहे.
भारतात यापूर्वी देखील सीएचपीव्हीने थैमान घातले आहे; परंतु देशात सद्यःस्थितीत सुरू असलेला चांदीपुरा व्हायरसचा धुमाकूळ हा गत २० वर्षांतील सर्वाधिक आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले. चिंतेची बाब म्हणजे गुजरातमध्ये प्रत्येक चार ते पाच वर्षात सीएचपीव्हीच्या प्रकोपात वाढ पाहायला मिळते. चांदीपुरा व्हायरस (सीएचपीव्ही) रॅबडोव्हिरिडे कुटुंबातील व्हायरस आहे. देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिण भागात विशेषकरून मान्सूनदरम्यान हा व्हायरस थैमानाचे कारण बनत असतो. ‘सँड फ्लाई’ आणि ‘टिक्स’ सारख्या रोगवाहक कीटकामुळे हा विषाणू पसरतो. लवकरच उपचार घेतल्यास जीवाला असलेला धोका टळण्याची शक्यता अधिक असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले.
ज्या भागात याचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, त्याठिकाणी देखरेख वाढविण्याची आणि वेळेवर उपचार करण्यावर भर देण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. आंधप्रदेशात वर्ष २००३ साली एईएसने मोठे थैमान घातले होते. त्यावेळी ३२९ रुग्ण आढळले होते आणि १८३ जणांचा मृत्यू झाला होता. चांदीपुरा विषाणूमुळे हे सर्व जण दगावल्याचे अभ्यासातून समोर आले होते.