विशाल कदम
लोणी काळभोर, ता.२३ : ग्रामीण भागातील जनतेला मोफत व चांगली आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक वर्षांपासून लोणी काळभोर (ता. हवेली) येथे कार्यरत आहेत. या केंद्रामार्फत मोफत औषधे व रक्त तपासणी होत असल्याने शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे एक वरदान ठरले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.
आयुष्मान भव: या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य मेळाव्याचे शनिवारी (ता.२३) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला डॉ. रामचंद्र हंकारे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. रामचंद्र हंकारे बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हंकारे पुढे म्हणाले, ‘लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम पाहायला मिळाले. याचे आज मनापासून समाधान वाटत आहे. मात्र, हीच आरोग्यसेवा टिकविण्यासाठी सर्वांनी सचोटीने काम करावे.
प्रसूत झालेल्या मातांना बेबी किट
आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे प्रमाण वाढावे. यासाठी तीन मातांना प्रोत्साहनपर बेबी किटचे वाटप डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. रुपाली भंगाळे, डॉ. डी. जे. जाधव, डॉ. सुनील भोये, आरोग्य सहाय्यक रशीद शेख, लिपिक एम. एम. खेडेकर यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य केंद्रात विविध योजना सुरु
पीएमजय आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, रक्त संकलन कार्यक्रम, अवयवदान जनजागृती मोहीम, आयुष्यमान सभा, अंगणवाडी प्राथमिक शाळांमधील ० ते १८ वर्षे मुलांची आरोग्य तपासणी, तसेच १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी, सेवा सप्ताह व एन. सी. डी. कार्यक्रमानिमित्त उच्च रक्तदाब, मधुमेह, आरोग्य तपासणी करणे. यांसारख्या आरोग्य तपासणींसह जनजागृती करण्याचे काम लोणी काळभोर येथील आरोग्य केंद्रात होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन पुरस्कार
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा जिल्हास्तरीय आनंदीबाई जोशी आरोग्य गौरव पुरस्कार सलग सहाव्यांदा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने मिळवला आहे. तसेच स्वच्छ भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम असे दोन्ही पुरस्कार एकाचवेळी पटकावणारे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आहे.