प्रिया बंडगर
लोणी काळभोर : कर्करोगाचा धोका सर्वानाच वाढत असताना महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसह सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्राचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुशील देशमुख यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. २८) महिलांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुशिल देशमुख म्हणाले कि, महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर हि अत्यंत गंभीर बाब आहे. कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रकृतीत होणारे बदल, रोगाची लक्षणे यांकडे कानाडोळा केल्याने रोगाचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न केल्यास वेळीच रोगाचे निदान होऊ शकते. आणि रोगाचे निदान लवकर झाल्यास त्याच्यावर लवकर उपचार करता येतात.
दरम्यान, या शिबिरात प्राथमिक चाचण्यांसह महिलांशी निगडित इतरही चाचण्या करण्यात आल्या. महिलांना होणारे आजार व समस्या ओळखून लोणी काळभोर ग्रामपंचायत व प्राथमिक केंद्राच्या वतीने महिलांसाठी हे विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी दिली आहे.
यावेळी साधना सहकारी बँकेच्या संचालिका वंदना काळभोर, ग्रामपंचायत सदस्या संगीता काळभोर, ललिता काळभोर, ज्योतीताई काळभोर, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.