पुणे : असोसिएशन फॉर डायबेटिस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) संस्थेच्या माध्यमातून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे पूर्णवेळ मधुमेह मुक्ती व समुपदेशन केंद्र पुण्यात सुरु होणार आहे.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर शेजारच्या गल्लीत दुर्गाशंकर इमारतीमध्ये रविवार वगळता सायं. 5 ते रात्री 9 दरम्यान हे केंद्र सुरु असणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने 21 ते 30 नोव्हेंबर दरम्यान या केंद्रावर एचबीए 1 सी ही रक्त चाचणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केंद्रावर येऊन नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
या केंद्रासाठी इन्फोसिस फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले असून यासंदर्भातील घोषणा दीक्षित जीवनशैलीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. इन्फोसिसचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी हे यावेळी उपस्थित होते.
पुण्यासोबतच नागपूर येथे देखील अशाच प्रकारचे केंद्र सुरु होणार असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.येत्या 21 नोव्हेंबर पासून पुणे तर 1 डिसेंबरपासून नागपूर केंद्र कार्यरत होणार असून सर्व नागरिकांसाठी विनामूल्य समुपदेशन या केंद्राच्या मार्फत उपलब्ध असेल.
या केंद्रात वैयक्तिक समुपदेशन व मधुमेह तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळणार असून हे सर्व विनामूल्य उपलब्ध असेल. वेळोवेळी होणारा पाठपुरावा हे आमच्या केंद्राचे वैशिष्ट्य असेल.रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी व मधुमेह मुक्ती या विषयातील पुढील संशोधनासाठी या केंद्राचा फायदा होईल.
नजीकच्या भविष्यात पुणे व नागपूरसोबतच इतर मुख्य शहरांत देखील पूर्णवेळ केंद्रे सुरु करीत रुग्णांना मार्गदर्शन करण्याचा आमचा मानस आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यक्रम, रुग्णांना आलेले अनुभव एकमेकांशी शेअर करणे आदी माध्यमातून आम्ही जनजागृती करणार असल्याचे डॉ.दीक्षित यांनी सांगितले.